‘कोण राज ठाकरे आणि कोण..?’ भाजप आमदाराचा थेट सवाल; राजकीय वातावरण तापलं…

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल २० वर्षानंतर एकत्र आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले आहेत.

तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणला असताना, भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.


राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान ‘ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले होते. मात्र मतदानाच्या दिवशीच भाजप आमदारांनी ठाकरे बंधूंच्या मराठी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘कोण राज ठाकरे?’ असा थेट सवाल केल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे.
दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी यांना मनसेच्या भगवा गार्डबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी कोण राज ठाकरे आणि कोण भगवा गार्ड? मला त्यावर बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यासोबतच त्यांनी दहिसर वॉर्ड क्रमांक ८ मधील मतदान प्रक्रियेतील अडचणींकडे लक्ष वेधले.
अनेक मतदारांची नावे यादीत नाहीत. मुंबई महानगरपालिकेने दिलेली मतदार यादी मतदान केंद्रावर उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि आम्ही त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका करत “बाळासाहेबांनी उभी केलेली भगवाधारी शिवसेना अजून अस्तित्वात आहे का? असा सवाल उपस्थित केला.
मराठी मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर टीका करताना मनीषा चौधरी यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. एका बाजूला मराठी माणसाबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे त्यांच्या किचनमध्ये काम करणारे कोण आहेत ते बघा. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या किचनमध्ये सगळे नेपाळी आहेत, असा थेट टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
