लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून तारीख जाहीर…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरिस देण्यात आला. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याचे सरकारचे निजोजन होते. मात्र, सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत.
या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून मतदानापूर्वी अशा प्रकारे लाभ देणे चुकीचं असल्याचं सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं सांगितलं पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास मज्जाव केला.

यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर विचारले असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते निवडणूक आयोगाकडे गेले.
आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करु… जो मूळ हप्ता आहे तो आम्ही देतच आहोत, तो गेलाही आहे. आपण प्रत्येक मोठ्या सणाला आपण आगाऊ हप्ता देतो. निवडणूक आयोगाने आगाऊ हप्ता देऊ नका असं म्हटलं ठीक आहे आम्ही १६ तारखेनंतर देऊ…असे ते म्हणाले.