नात्याला काळीमा! सख्ख्या मामाचे भाचीसोबत घृणास्पद कृत्य, मामीचीही साथ अन्….,घटनेने जालना हादरले

जालना : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना जालन्यात उघडकीस आली आहे. सख्ख्या भाचीचे रक्षण करण्याऐवजी, सख्या मामानेच तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, या कृत्यात आरोपीच्या पत्नीने म्हणजेच मामीनेही साथ दिल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कदीम जालना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईचा हिंगोली येथील व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र, कौटुंबिक वादातून काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आईने दुसरे लग्न केल्यामुळे पीडित मुलगी जालन्यात आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. मात्र, ज्या मामाच्या आश्रयाला ती आली होती, तोच तिचा वैरी बनला.

दरम्यान, आरोपी मामा दारूच्या नशेत गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. या छळात त्याला त्याच्या पत्नीचीही साथ मिळत होती. अखेर या जाचाला कंटाळून मुलीने मामाच्या घरातून पळ काढला आणि हिंगोली येथे आपल्या वडिलांचे घर गाठले. तिथे तिने आजीला आपली आपबिती सांगितली. आजीने तात्काळ मुलीला घेऊन जालना गाठले आणि पोलिसात तक्रार दिली.