मनसेला बालेकिल्यात मोठा धक्का ; संतोष नलावडेंनी 20 वर्षाची साथ सोडली, पत्रातून धक्कादायक आरोप..

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिवडीत मोठा धक्का बसला आहे.शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागची धक्कादायक कारणे पत्रातून उघड झाली आहेत.

वीस वर्षाची साथ सोडून संतोष नलावडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. पक्ष सोडताना त्यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात अन्याय,वरिष्ठ नेत्यांची वागणूक आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी अनेक कारणे दिले आहेत. त्यांनी राजसाहेबांच्या विचारांनी जो पक्ष उभा राहिला, तो आता पक्षातील काही नेत्यांच्या स्वार्थामुळे धोक्यात आला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून वापरा आणि फेकून द्या असे धोरण राबवले जात असल्याचा आरोप केला आहे.
पुढे संतोष नलावडे यांनी पत्रात असे म्हटले आहे की, राजसाहेबांनी त्यांच्या विचारांनी जो पक्ष फुलवला, आपल्यासारख्या निष्ठावंतांनी रक्त सांडून त्याचा वटवृक्ष केला. त्या वटवृक्षाच्या सावलीत पक्षातील काही नेते आपल्या स्वार्थासाठी वटवृक्ष छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवडी हा मनसेचा बालेकिल्ला असतानाही, आगामी निवडणुकीच्या जागावाटपात पक्षाने घेतलेल्या निर्णयावर नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग, भांडुप हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. आज निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेला राजीनाम्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.
तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जे अपयश आले, त्याचे खापर सर्वस्वी आमच्यावर मारून आज आमचा राजकीय बळी दिला जात आहे. हे अयोग्य आहे. हे पाप आहे, असे संतोष नलावडे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.