पुण्याच्या 80 वर्षीय आजोबांना लगेच श्रीमंत होण्याचा मोह आवरला नाही, केली एक चूक अन् 30 लाखांना गंडा..

पुणे : पुणे शहरातील सायबर गुन्हेगारीचे सत्र सुरु असून, सध्या अशीच एक घटना बुधवारीच शहरातून सव्वा कोटीच्या सायबर फसवणुकीच्या घटना समोर आल्या होत्या. यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने कर्वे रस्ता परिसरातील एका 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 29 लाख 30 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या विविध योजना सांगितल्या. “कमी गुंतवणुकीत मोठा नफा” मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.

सुरुवातीला आजोबांनी काही रक्कम गुंतवली असता, चोरट्यांनी त्यांना बनावट ॲपच्या माध्यमातून मोठा नफा झाल्याचे भासवले. हा नफा पाहून आजोबांनी अधिक गुंतवणुकीचा निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्याने एकूण 29 लाख 30 हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर जमा केले.

मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःची मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
