एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना दे धक्का!! दोन बड्या नेत्यांना फोडत केला करेक्ट कार्यक्रम…

नाशिक : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज्यभर दौरे करून शिवसेनेची ताकद वाढवण्यावर भर देत आहेत.

अशातच नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून दोन माजी महापौरांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर होणारे पक्षांतर हे नवीन नसले तरी प्रचार सुरू असतानाही घडलेल्या या घडामोडीमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा ‘ऑपरेशन’ यशस्वी करत विरोधकांना धक्का दिल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.

ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभ दीप’ निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिकमधील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.