राज्यातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज! निधी वितरणासाठी मिळाला ग्रीन सिग्नल, खात्यात केव्हा जमा होणार पैसे?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा सुरू असून नगरपंचायत, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांमुळे अनेक योजनांच्या अंमलबजावणीवर आचारसंहितेचा परिणाम होत असल्याची चर्चा होती.

याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नव्हता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने हा निधी रखडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाकडून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली असून या योजनेच्या निधी वितरणासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लाखो महिलांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना ही कोणतीही नवीन योजना नसून ती यापूर्वीपासूनच सुरू आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणुका सुरू असल्या तरी आधीपासून लागू असलेल्या योजनांच्या लाभ वितरणावर कोणताही प्रतिबंध लावता येत नसल्याचे आयोगाचे मत आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीत आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेशी कोणताही थेट संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सरकारकडून निधी वितरित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या चार ते पाच दिवस आधी हा निधी वितरित होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी निधीची तरतूद आधीच करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
