मोठी बातमी! नितीन गिलबिले हत्याकांडात मोठा ट्विस्ट ; माजी नगरसेवक किसन तापकिरांच्या समावेशाने खळबळ

पुणे : गेल्या काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली वरमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. या खुनाच्या तपासाला आता वेग आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती.आता या खून प्रकरणात माजी नगरसेवक किसन तापकीर यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे त्यांना संशयितामध्ये समाविष्ट करण्यात आले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. आरोपींनी गिलबिले यांना एका काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमध्ये बसवलं होतं. यानंतर पुढच्याच सेकंदात काही कळायच्या आत गोळ्या घातल्या होत्या. यानंतर आरोपींनी गिलबिले यांचा मृतदेह घटनास्थळी टाकून पळ काढला होता.या प्रकरणी तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या होत्या. पण आता नितीन गिलबिले हत्याकांडात मोठा ट्विस्ट आला आहे. या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड एक माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. किसन तापकीर असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. त्यानेच नितीन गिलबिले यांची हत्या घडवून आणली, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या पूर्वी पोलिसांनी अमित जीवन पठारे (वय ३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमीत फुलचंद पटेल (वय ३१, रा. गायकवाडनगर, दिघी) अशा तीन जणांना अटक केली होती. या अटकेतील आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव घेतल्याचं पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. अद्याप तापकीर सापडले नसून दिघी पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहे. जमिनीच्या व्यवहारातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
