मुंबई हादरली ; ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, काय आहे कारण?

.

मुंबई : मुंबईतील कुर्लामध्ये एका तरुणाला त्याच्याच मित्रांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमधील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर फेज – ३ बिल्डिंगमध्ये एका २१ वर्षीय अब्दुल रहमान या तरुणाचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच्या पाच मित्रानी त्याला इमारतीखाली बोलावले. मित्रांनी सोबत केकही आणला होता. सुरुवातीला केक कापला. त्यानंतर अब्दुलवर अंडी फेकली. दगड फेकले.यावरच न थांबता या मित्रांनी स्कूटीवरुन एका बाटलीत आणलेला ज्वलनशील पदार्थ आणला होता. तो अब्दुलच्या अंगावर टाकला आणि त्याला आग लावली. अचानक आग लागल्याने अब्दुल रहमानने आपले कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो भाजला. जखमी झालेल्या अब्दुल रहमानला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सोसायटीमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे.

याप्रकरणी त्याचे पाच मित्र अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, आणि शरीफ़ शेख याच्यावर पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.पीडित अब्दुल रहमानने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम ३ (५) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने या पाचही आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास विनोबा भावे पोलीस करत आहेत. आरोपींनी अब्दुलवर टाकलेला ज्वलनशील पदार्थ नेमका काय होता, याची पोलीस पडताळणी करत आहेत. हा गुन्हा केवळ वाढदिवसाच्या मस्करीतून झाला की यामागे काही कटकारस्थान होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी या सर्व तरुणांनी असं कृत्य का केले? याची माहिती समोर आली नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.