दारु पिऊन रस्त्यावर पडलेल्या बेवड्याला बाजुला करण्याची मदत पडली महागात ! दारुड्याचा मुलगा व दोन मित्रांनी केली दोघांना मारहाण….

लोणी काळभोर : दारु पिऊन रस्त्यावर पडलेल्या इसमांस उचलुन बाजुला करण्याकरीता गेले. या गोष्टीचा राग येऊन त्याचा मुलगा व दोन मित्रांनी शिवीगाळ करुन लाथा बुक्याने मारहाण करुन कमरेच्या बेल्टने मारहाण करुन जखमी केले असल्याची घटना कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आदित्य धर्मपाल कांबळे (वय २१, रा.वार्ड नं ५ पठारेवस्ती, आंबाबाई मंदिराच्या पाठिमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, गौरव यशवंत रोकडे, दत्तात्रय राजेंद्र धायगुडे व नितीन नायकवडे (तिघेही रा.पठारेवस्ती, कदमवाकस्ती, ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य कांबळे हा रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारांस कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पठारेवस्ती येथुन त्यांचा मित्र सुशांत रविंद्र दगडे याला घरी सोडविण्यासाठी चालत निघाले होते. त्यावेळी त्यांचे वस्तीमध्ये राहात असलेले यशवंत रोकडे हे दारु पिऊन रस्त्याने जाणारे गल्लीतील बोळात पडले होते. त्यामुळे आदित्य व सुशांत हे त्यांना उचलण्यासाठी गेले असता ते शिवीगाळ करु लागले त्यामुळे आदित्य त्यांना तुम्ही मला विनाकारण शिवीगाळ करु नका आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आलो आहे असे म्हणाला. तरीही ते मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते.काही वेळाने यशवंत यांचा मुलगा गौरव यशवंत रोकडे, त्याचे मित्र दत्तात्रय राजेंद्र धायगुडे व नितीन नायकवडे हे तेथे आले व ते आदित्य व सुशांतला तुम्ही माझे वडीलांना एकट्याला बघुन मारहाण करता का? असे म्हणून शिवीगाळ करुन, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी आम्ही तुमच्या वडीलांना उठण्यासाठी मदत करत असल्याचे समजावुन सांगत असतानाही दत्ता धायगुडे याने कमरेचा चामडी बेल्ट काढून मारहाण केली. यामुळे ते दोघे जखमी झाले आहेत. आरडाओरड ऐकून स्थानिक रहिवासी तेथे जमा झाले. त्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. यानंतर आदित्य याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.