पुणे स्टेशनवर ओळख, तिला घरी आणलं अन् बाप-लेकाचं भयानक कांड, घटनेने खळबळ…

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

त्यात पुन्हा एकदा पुण्याच्या येरवडा परिसरातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जिथे एका ४० वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि मृत महिला यांची काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन परिसरात ओळख झाली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी त्याने तिला आपल्या येरवडा येथील घरात बोलावले होते. महिला घरी आल्यानंतर त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादही झाले होते.

वडील आणि पोराने केलेल्या मारहाणीत महिला रक्ताच्या थारोळ्यात जखमी होऊन जागीच कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दोघांकडून झालेला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह घरातच लपवून ठेवला.
पण काही दिवसांनी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने दोघांनी तो लोहगाव-वाघोली रोडवरील कचरापेटीत फेकून दिला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा संपूर्ण प्रकार उघड झाला असून आरोपींनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.