राजन पाटील साहेब, चिरंजीवांला सांगा थोडं दमाने घ्या!! अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यामुळे रोहित पवारांनी खडसावले…

पुणे : अनगर नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या स्नुषा यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. असे असताना मात्र, छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.

यावेळी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिले. अजित पवार कोणाचाही नाद करा पण आमचा नाही असे म्हणत जल्लोष केला. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
रोहित पवार म्हणाले, आदरणीय राजन पाटील साहेब, आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही.

ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या. असा सल्ला देखील आमदार रोहित पवार यांनी दिला.
तसेच ते म्हणाले, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा..! अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता पाटील नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.