आधी वार मग दगडाने ठेचलं, पुण्याच्या सिंहगड कॉलेजजवळ २२ वर्षाच्या तरुणाची हत्या, घटनेने खळबळ…


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच आता पुणे शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. सिंहगड रोड परिसरातील सिंहगड कॉलेजच्या जवळ एका 20 ते 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये ही आणखी एक भर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना आज उघडकीस आली. परिसरातील काही नागरिकांनी रस्त्याच्या कडेला तरुणाचा गंभीर अवस्थेत मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ सिंहगड रोड पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तरुणाच्या डोक्यावर मोठा मार झाल्याचे आढळले. प्राथमिक पंचनामा आणि पाहणीवरून दगडाने ठेचून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी घटनास्थळ ताब्यात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहेत. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत. हत्येच्या पद्धतीवरून ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिंहगड रोड परिसरात गेल्या काही महिन्यांत खून, हाणामारी आणि गँगवारसारख्या घटना वाढल्या असल्याने पोलिसांवर गस्त वाढविण्याचा दबाव वाढत आहे. परिसरातील काही विद्यार्थ्यांनी आणि स्थानिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सोय नसल्याची तक्रारही केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!