हवेली तालुक्याच्या तहसीलदारपदी डॅा. अर्चना निकम यांची नियुक्ती…

उरुळीकांचन : पुणे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या हवेली तहसीलदारपदी डॅा. अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाने हे आदेश शुक्रवारी (ता.१४ ) दिले आहेत.

हवेलीचे तत्कालीन तहसीलदार किरण सुरवसे यांची सोलापूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती. त्यामुळे सोलापूर निवडणूक विभागात कार्यरत असलेल्या तहसीलदार अर्चना निकम यांची हवेलीच्या तहसीलदारपदी नेमणूक करण्यात आली आहे.
डॅा. अर्चना निकम यांनी पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार म्हणून काही काळ पदभार सांभाळला आहे. देहू व आळंदी येथे आषाढी वारीनिमित्त आलेल्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. यापूर्वी त्यांनी बारामतीचे तहसीलदार पद सांभाळून आपल्या कामाची चुणूक दाखवली होती.

दरम्यान, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदींनुसार तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने नवीन ठिकाणी नेमणुका करण्यात आल्या आहेत.