अजित पवारांना मोठा धक्का! बिहार निवडणुकीत राष्ट्रवादीचं वाट्टोळं झालं, सर्व उमदेवारांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर…

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी आधी पोस्टल आणि नंतर ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलांनुसार, बिहारमध्ये भाजप 84, जदयू 78 जागांवर आघाडीवर आहे. तर राजद 32 आणि काँग्रेसचे उमेदवार सात जागांवर आघाडीवर आहे.

यामुळे आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता आहे. या सगळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पानिपत झाले. बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने १५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र एकही जागेवर त्यांना यश मिळताना दिसत नाही.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला आघाडी घेता आलेली नाही. १५ पैकी १३ जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना अद्याप ५०० मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

यामुळे बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागणार आहे. अजित पवार यांनी हा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याच्या आशेने बिहारच्या निवडणुकीत एनडीएसोबत फारकत घेऊन स्वत:चे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरवले होते.
असे असताना या सर्व उमेदवारांनी पार निराशा केल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या जाहीर होत आहे. या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.