शेतकरी तरुणाचे ३४ वय झाले, तरीही लग्न जमेना, तरुणाने थेट शरद पवारांना पत्र लिहिले अन्…

पुणे : ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांच्या लग्नाची समस्या किती गंभीर होत चालली आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. लग्न होत नसल्याने त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने थेट ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच भावनिक साकडं घातलं आहे.

वय वाढत चाललं, पण लग्नाचा योग जुळत नाही… आर्थिक परिस्थितीही दुर्बल, म्हणून कोणीही मुलगी देत नाही. या व्यथेतून त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका ३४ वर्षीय शेतकरी तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहून आपल्या संसाराचा प्रश्न त्यांच्या समोर ठेवला आहे. त्याची ही अनोखी विनंती सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
त्या तरुणाने पत्रात म्हटलं आहे, माझं वय ३४ वर्षं पूर्ण झालं आहे. दिवसेंदिवस वय वाढत असल्याने मला वाटतं भविष्यात माझं लग्न होणार नाही. त्यामुळे माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी.” पुढे तो म्हणतो, मी कोणत्याही समाजातील मुलीसोबत लग्न करण्यास तयार आहे. मुलीच्या माहेरी राहून संसार चालवायला मला काहीच हरकत नाही. मी मेहनत करून तिच्या घरचं काम सांभाळेन.

त्याने पुढे शरद पवारांना भावनिक आवाहन केलं, माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करा आणि मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळवून द्या. मला जीवनदान द्याल, हे तुमचं उपकार मी विसरणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार अकोला दौऱ्यावर असताना त्या तरुणाने त्यांना हे पत्र स्वतःहून दिलं. या पत्राची माहिती मिळताच पवारांनी पक्षाच्या बैठकीत जयंत पाटील यांना हे पत्र वाचून दाखवायला सांगितलं.
दरम्यान, याबाबत बोलताना शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले, “त्या तरुणाचं पत्र पाहून साहेबांनी आम्हाला त्याच्या मदतीसाठी प्रयत्न करायला सांगितलं. आता आम्ही विदर्भात त्या तरुणासाठी योग्य वधू शोधण्याचं काम सुरू करणार आहोत.