रिंगरोड प्रकल्पाबाबत महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडला आणखी ७४ गावे जोडणार, यादी आली समोर…

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांना दररोज कोंडी, प्रदूषण आणि प्रवासात होणाऱ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुण्यात दोन नवीन रिंग रोड प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे दोन्ही रिंग रोड बांधणार आहेत.
यापैकी MSRDC च्या रिंग रोडचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, आता या प्रकल्पाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. नगरविकास विभागाने यापूर्वीच पाच तालुक्यांतील ११७ गावांचा विकास आराखडा तयार करण्यास मंजुरी दिली होती.

या आराखड्याचे काम सुरू असतानाच, आता MSRDC ने आणखी ७४ गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नगरविकास विभागाला अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.
MSRDC च्या मते, रिंग रोडच्या संपूर्ण पट्ट्याचा विकास एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी या अतिरिक्त गावांचा समावेश अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व भागांचा नियोजनबद्ध विकास साधता येणार आहे.
कोणते तालुके आणि गावे होणार समाविष्ट?
या नव्या मागणीमध्ये हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे (राजगड) या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
हवेली तालुका – कोंढाणपूर, सांगरुण, आर्वी, गौडदरा, कल्याण, तानाजीनगर, मोरदारवाडी, अवसरे, रहाटवडे, शिवपूर, खेड शिवापूर, रामनगर.
भोर तालुका – किकवी, ससेवाडी, शिंदेवाडी, कासुर्डी, शिवरे, वेळू, हरिश्चंद्री, कापूरहोळ, दिवळे, कामथडी, केळवडे, नसरापूर, नायगाव, वरवे बुद्रुक, वरवे खुर्द.
पुरंदर तालुका – दिवे, पवारवाडी, जाधववाडी, केतकवले, चिवेवाडी, देवरी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, काळेवाडी, सोनोरी, सिंगापूर, झेंडेवाडी, गुन्होली, आंबोडी.
मुळशी तालुका – अंबडवेत, भरे, कासार आंबोली, मुकाईवाडी, उरावडे, भुकूम, पिरंगुट, आंबेगाव, पौड.
वेल्हे तालुका – कोंडगाव, आंबवणे, चिंचोळे बुद्रुक, करंजवणे, आडवली, आस्करवाडी, केतकवणे, कोलवाडी, लाशीरगाव, मार्गासनी, खांबवाडी, मांगदरी, विंजर, वांगणी, दापोडे, चिंचाळे खुर्द, बोरावळे, निगडे बुद्रुक, माळगाव, रांजणगाव, कातगाव.