मोठी बातमी! पुणे जमीन व्यवहारातील फरार शितल तेजवानींना दिलासा ; ‘या ‘ प्रकरणातून सुटका,कारण….

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर 1800 कोटींची मालमत्ता 300 कोटींत खरेदी केल्याचा आरोप होता. या प्रकरणातील फरार असलेल्या शीतल तेजवानी यांचं नाव बोपोडी जमीन प्रकरणातही चर्चेत आलं होतं. मात्र आता तेजवानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.पोलिसांच्या तपासानंतर त्यांनी स्पष्ट केलं आहे की, या व्यवहाराचा पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी किंवा शीतल तेजवानी यांच्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे दोघांची नावं प्रकरणातून वगळण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल 1800 कोटींच्या मालमत्तेचा केवळ 300 कोटी रुपयांत व्यवहार केल्याचा गंभीर आरोप झाला होता. या खरेदी-विक्रीदरम्यान नियमांनुसार कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क भरायचे असताना केवळ 500 रुपयांत व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर या व्यवहारात पॉवर ऑफ अॅटर्नी धारक शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच बोपोडी येथील प्रकरणातही त्यांचं नाव जोडलं जात होतं. मात्र आता या प्रकरणातून शीतल तेजवानी यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.या व्यवहाराचा पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी किंवा शीतल तेजवानी यांच्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे दोघांची नावं प्रकरणातून वगळण्यात आली आहेत. या प्रकरणावर पुणे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी भाष्य केलं आहे.

खडक पोलीस ठाण्यातील एफआयआरमध्ये बोपोडी जागेची प्रकरण आणि मुंढव्यामध्ये असलेल्या एका जागेशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. बोपोडीमध्ये इतर 6 आरोपी आणि मुंढवा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील असे दोन आरोपी आहेत, अशी माहिती मासाळ यांनी दिली.दरम्यान, एका एफआयआरमध्ये दोन स्वतंत्र जमीन व्यवहारांचा एकत्रित उल्लेख झाल्यामुळे सुरुवातीला गोंधळ निर्माण झाला होता. आता पोलिसांनी हा गोंधळ दूर करत तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना बोपोडी प्रकरणात थेट जबाबदार धरता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.यानंतर आता बोपोडी जमीन प्रकरणातून शीतल तेजवानी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे