ठाकरे गटासोबतच्या युतीआधी मनसेचा मोठा प्लॅन! जागा वाटपाआधी पडद्यामागे नेमकं घडतंय काय?

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, आता या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी महायुतीमधील तीनही पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
येत्या काही तासांमध्ये मुंबई महापालिकेसाठीचे आरक्षण जाहीर होणार आहे. तर, दुसरीकडे आता जागा वाटपांवरून घडामोडींना वेग आला आहे. मनसेने निवडणुकीपूर्वी आपली मोर्चेबांधणी वेगवान सुरू केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढ झाली. त्यानंतर मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जवळीक दिसून आली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेकडून आपला ग्राउंडवरील होम वर्क पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीनंतर मनसे आता जागा वाटपाच्या अनुषंगाने तयारी करत आहे.
शिवसेना ठाकरे गटासोबत संभाव्य युतीची शक्यता लक्षात घेऊन मनसेने २२७ पैकी १२५ प्रभागांचा सखोल अभ्यास केला आहे. या जागांवर मनसेचे उमेदवार विजयी होण्याची अधिक शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेकडून या जागांचा आग्रह होण्याची अधिक शक्यता आहे.
माहीम, दादर, परळ, लालबाग, विक्रोळी, भांडुप आणि घाटकोपरसारख्या मराठी मतदारवस्त्यांमध्ये मनसे विशेष रणनीती आखत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेने सध्या १२५ मजबूत प्रभागांची यादी तयार केली आहे. या सर्व प्रभागांवर सक्षम आणि स्थानिक पातळीवर ओळख असलेल्या उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाकरे गटाशी युती झाली, तर जागावाटपात या प्रभागांना उच्च प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही समोर येते.