पुणे जमीन घोटाळ्यातील धक्कादायक खुलासा ; 1 रुपयाही न घेता 300 कोटीचा व्यवहार, यंत्रणांची दिशाभूल?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. खरेदी खतावरून ही बाब समोर आली आहे.कुलमुखत्याधारक शीतल तेजवानी यांनी 300 कोटींच्या जमिनींच्या व्यवहारापोटी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीकडून एक रुपया न घेता व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या खरेदीखतावरून ही भलीमोठी रक्कम कशी आणि केव्हा देण्यात येणार याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. व्यवहार केवळ शब्दावर झाला का? असा सवाल करण्यात येत आहे. हे प्रकरण समोर आले तर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी ही अगोदरच चाल खेळली नाही ना? अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मास्टरमाइंड शीतल तेजवाणीचा फोन गेल्या दोन दिवसांपासून लागत नसल्याचे पोलिसांच्या उशीरा का असेना लक्षात आले. त्यानंतर आता शीतल परदेशात तर पळून गेली नाही ना? अशी शंका पोलिसांना आली आहे. शीतलच्या डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. शीतलने अमेडियाकडून एक रुपयाही न घेता खरेदीखत का करून दिले असा मोठा प्रश्नही पोलिसांना पडला आहे.
या खरेदीखतावर दोन्ही पक्षांची नावं, स्वाक्षऱ्या, कागदपत्राआधारील पुरावे यांची माहिती असते. तर खरेदीखतावेळी किती पैसे दिले, ते कोणत्या पद्धतीने, ऑनलाईन, धनादेश, रोखीत दिले याचा उल्लेख असतो. जमीन विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात याविषयीची सविस्तर माहिती देण्यात येते. पण पुणे जमीन गैरव्यवहारात अशी कोणतीही माहिती या खरेदीखतावर नाही. 300 कोटींच्या व्यवहाराचे कोणतेही विवरण खरेदीखतावर देण्यात आले नाही. विशेष म्हणजे एक रुपयांचाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे केवळ विश्वासावर हा व्यवहार झाला का? असा सवाल करण्यात येत आहे. तर दुय्यम निबंधकांनी हे खरेदीखत डोळ्याखालून घातले नाही का? असा सवाल करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
