मोठी बातमी! संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर ; मतचोरीसह विविध मुद्द्यांनी वातावरण तापणार?

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. त्यानुसार संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिवेशनात बरीच वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. इंडिया ब्लॉकमधील पक्षांनी एसआयआरवरुन रान पेटवलं आहे. त्याचे पडसाद आता संसदेत उमटू शकतात. त्याचबरोबर मत चोरीचा ही मुद्दा या अधिवेशनात गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. ‘राष्ट्रपती महोदयांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होईल. हे अधिवेशन सार्थकी लागेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत होईल आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण होतील,’ असं रिजिजू यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यानुसार या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
संसदेच्या होऊ घातलेल्या अधिवेशनाचा कालावधी अन्य अधिवेशनांपेक्षा कमी असेल. या अधिवेशनात बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद उमटताना दिसतील. देशातील १२ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक आयोगानं विशेष सखोल फेरनिरीक्षण सुरु केलं आहे. त्याला विरोधी पक्षांकडून विरोध सुरु आहे. मतदार यादीतील अनेक घोळ समोर आले आहेत. या संदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या तीन महिन्यांत तीन पत्रकार परिषदा घेत पुराव्यांसह मतचोरीचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता हा विषय संसदेत गाजण्याची दाट शक्यता आहे.
