मोठी बातमी! पार्थ पवार यांना जमिनीचा व्यवहार भोवणार ;अखेर गुन्हा दाखल होणार?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहेत. पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीला १८०० कोटींचे मूल्य असलेली जमीन ३०० कोटींमध्ये दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव का घेण्यात आलं नाही त्याच्यावर गुन्हा का नोंद झाला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. दरम्यान या प्रकरणी आता,पार्थ अजित पवार यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान संबंधित वादग्रस्त कंपनीचे कायदेशीर अधिकार दिग्विजय पाटील यांच्याकडे आहे.मात्र पुढील तपासात कंपनीमध्ये संचालक पदावर असणारे पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पार्थ अजित पवारांनीच मूळ शासकीय जमीन खरेदी केली असल्याचे पुरावे असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या कंपनीत पदावर असल्याने पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त चौकंशीत पार्थ नाव समोर आल्यावर एफआयआरमध्ये अतिरिक्त आरोपी म्हणून नाव टाकता येऊ शकते. त्यानुसारच पार्थ यावर कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.
