विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतदान; १८२ उमेदवार रिंगणात, बंडखोरीमुळे राजकीय चुरस वाढली

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आज विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, मतदार आज त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. महायुतीतील बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी आणि महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतींमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

राज्यातील २ हजार ४१९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतदान


शुक्रवारी, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे.
निवडणुकीच्या मैदानात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांविरोधात पक्षातीलच नेत्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विभागातील सहा जिल्ह्यांत ४४५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार आहेत. याशिवाय चंद्रपूरमध्ये ३२ हजार २६५, गोंदियात २२ हजार १७६, वर्ध्यात २१ हजार ७४२, भंडाऱ्यात २१ हजार ३४९ आणि गडचिरोलीत १३ हजार ६०८ मतदार आहेत.
या मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. भाजपचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी, वंचित बहुजन आघाडीचे मंगेश वानखेडे आणि शिक्षक भारतीचे अतुल देशमुख हे प्रमुख उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने लढतीतील चुरस आणखी वाढली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे २ हजार ५३५ अधिकारी-कर्मचारी आणि केंद्र शासनाचे ४७६ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत चुरस
पुणे जिल्ह्यात आज एकूण २३२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी १६० केंद्रे पदवीधर, तर ७२ केंद्रे शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेनेचे सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात लढत होत आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव आणि काँग्रेसच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यातील लढतीकडे लक्ष लागले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारसंख्या आणि मतदान केंद्रे :
पुणे : ८८,२०२ मतदार, १६० केंद्रे
सातारा : ४७,४६३ मतदार, ९३ केंद्रे
सोलापूर : ४९,०७२ मतदार, ११७ केंद्रे
सांगली : ८८,०७० मतदार, १५९ केंद्रे
कोल्हापूर : १,१४,५६२ मतदार, २१२ केंद्रे
या मतदारसंघात एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदार असून, ७४१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारसंख्या आणि मतदान केंद्रे :
पुणे : १६,८२२ मतदार, ७२ केंद्रे
सोलापूर : १५,३०३ मतदार, ७६ केंद्रे
सातारा : ९,४५४ मतदार, ४४ केंद्रे
सांगली : ८,०६२ मतदार, ४८ केंद्रे
कोल्हापूर : १२,२९९ मतदार, ७० केंद्रे
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण ६१ हजार ९४० मतदार असून, ३१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात ८४२ मतदान केंद्रे
छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांत मतदानासाठी ८४२ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे.
या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापासूनच बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीवर एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलीप घुगे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे आघाडीतील मतविभाजनाचा निकालावर किती परिणाम होणार, याबाबत उत्सुकता आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ७३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी २९ हजार १४५ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २२ हजार ७४५ पुरुष आणि ६ हजार ४०० महिला मतदारांचा समावेश आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात कोण बाजी मारणार?
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांत मतदान होत आहे. शिक्षक मतदारसंघातील ही लढतही राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
आज मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. महायुतीतील बंडखोरी, महाविकास आघाडीतील मतविभाजन आणि प्रमुख उमेदवारांमधील थेट लढतींचा निकालावर काय परिणाम होतो, हे निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
