निवडणुका जाहीर होताच वातावरण तापलं ; ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर उत्तर भारतीय सेनेनं लावलं वादग्रस्त वक्तव्य….

पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा देखील केली आहे. 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने वादग्रस्त बॅनर लावला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी, वांद्रे, शिवाजी पार्क, मातोश्री, शिवतीर्थ आणि शिवसेना भवन या ठिकाणी झळकत असलेल्या एका बॅनरमुळे नवा वाद उफाळून आला आहे. या बॅनरवर सावधान असा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतीय सेनेने लावलेला बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा मजकूर यात आहे. तसेच महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक, असेही यात नमूद करण्यात आले आहे. या बॅनरच्या खाली उत्तर भारतीय सेना आणि त्यांचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देणे, असा या बॅनरमागील उद्देश असल्याची चर्चा होत आहे. उत्तर भारतीय मतदारांना एकत्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात फूट पाडणाऱ्यांविरुद्ध हा इशारा असल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.आता यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
