बिबट्या दिसताच गोळ्या घाला! वनविभागाने दिले आदेश, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरची दोन पथके दाखल

पुणे : गेल्या तीन महिन्यांत पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिघांच्या मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता वनविभाग सतर्क झाला असून नरभक्षक बिबट्या शोधून त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी, ‘शार्पशूटर’ची दोन पथके घटनास्थळी दाखल झाल्याचे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी ही माहिती दिली आहे.

पिंपरखेड परिसरात बिबट्याचा मागोवा आणि शोध घेणारी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित अलार्म सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. सुरक्षा आणि उपाययोजना नियंत्रणाचा भाग म्हणून पहाटे सहा ते सकाळी नऊ आणि दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत ती सुरू राहणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान रोहन बोंबे (वय १३) या मुलाचा रविवारी, बिबट्याने बळी घेतल्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. जमावाने वनविभागाचे वाहन, तसेच पिंपरखेड येथील बेस कॅम्पचे कार्यालय पेटवून दिले. त्यानंतर रात्री काही काळ बेल्हे-जेजुरी मार्गावर रास्ता रोको केले. त्यानंतर आता वनविभाग सतर्क झाला आहे.
बिबट्यामुक्त पुणे जिल्ह्यासाठी, मंचरच्या नंदी चौकात, जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांना रास्ता रोकोची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सकाळी अकरापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक आठ तास बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांचे हाल झाले. त्यानंतर आता तिघांच्या मृत्यूने झालेल्या उद्रेकाची दखल उच्चस्तरावर घेण्यात आली. अन पिंपरखेड परिसरात शार्पशूटरची दोन पदके दाखल करण्यात आली.
