रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणात महत्त्वाची अपडेट ; पोलिसांसह शिक्षण विभागातील अधिकारीही अडचणीत? चौकशीसाठी…..

मुंबई : मुंबई शहरातील पवई येथे एका स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. या प्रकरणी आता धक्कादायक खुलासे समोर येत असताना मृत पावलेल्या रोहितने राज्य सरकारच्या शिक्षण विभागावर फसवणुकीचा आरोप केला होता, त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे आता शिक्षण विभागातील अधिकाराही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे प्रकरण?

पवईच्या महावीर क्लासिक इमारतीमधील आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्या याने 17 मुलांसह एकूण 20 लोकांना ओलीस ठेवले होते. यावेळी मुलांना सोडवण्यासाठी स्टुडिओत शिरलेल्या सहायक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहितवर गोळी झाडली. छातीत गोळी लागल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेच्या न्यायालयीन चौकशीही सुरू होणार आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, आता या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. रोहितवर गोळी झाडण्याची वेळ का आली? छातीऐवजी इतरत्र गोळी झाडून त्याला रोखता आले असते का? क्यूआरटीला बोलावले असताना मुंबई पोलिस आत का शिरले? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं मोठं आव्हान गुन्हे शाखेसमोर आहे.


रोहित आर्या हा शिक्षण विभागाच्या ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’ आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ या उपक्रमांशी जोडला गेला होता. रोहितचा आरोप होता की, “या दोन्ही उपक्रमासाठी सरकारने मी दिलेली संकल्पना वापरली. मात्र त्याचे श्रेय आणि पूर्ण पैसे दिले नाहीत.” या आरोपात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
