जयंतीदिनी काळजाला पुन्हा जखम! जिथे अजितदादांचा अखेरचा प्रवास थांबला, त्याच ठिकाणी सुनेत्रा पवार बराचवेळ निःशब्द; गोजुबावीत प्रत्येक क्षण झाला भावूक


बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज बारामती पुन्हा एकदा भावनांनी भारावून गेली. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना पवार कुटुंबीयांनी दिवसाची सुरुवात अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करून केली. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते गोजुबावी येथील त्या धावपट्टीने, जिथे २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे चार्टर्ड विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली होती.

पहाटे विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार थेट गोजुबावी येथील अपघातस्थळी पोहोचल्या. त्यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील, विजया पाटील आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. सर्वांनी दुर्घटनास्थळी फुले अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर सुनेत्रा पवार काही काळ कोणाशीही संवाद न साधता त्या जागेकडे शांतपणे पाहत बसल्या. त्यांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि चेहऱ्यावर उमटलेले दुःख पाहून उपस्थित कार्यकर्तेही भावूक झाले.

२८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांचे चार्टर्ड विमान गोजुबावी गावाजवळील धावपट्टीवर कोसळले होते. अपघातानंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता. सुरुवातीला घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र तपास यंत्रणांच्या चौकशीत त्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

जयंतीच्या पूर्वसंध्येलाच मध्यरात्री १२ वाजता सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानमधील अजितदादांच्या स्मृतीस्थळी गेल्या होत्या. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी शांतपणे श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सकाळी अपघातस्थळी दिलेल्या भेटीमुळे अजितदादांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांवर अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. “पूर्वी हा दिवस घरभर आनंद, शुभेच्छा आणि उत्साह घेऊन यायचा. आज त्याच दिवसाला ‘जयंती’ म्हणताना मन स्वीकारायला तयार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी ताकद होता. तुमचा आधार, तुमचं प्रेम आणि तुमची साथ अचानक हिरावून गेली, यावर आजही विश्वास बसत नाही,” असे त्यांनी लिहिले. “तुम्ही आज शारीरिकदृष्ट्या आमच्यात नसला तरी तुमचे विचार, लोकसेवेची भावना आणि शिस्त कायम आमच्यासोबत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, बारामतीसह राज्यभरात अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अजित पवारांच्या अनुपस्थितीत साजरी होत असलेली ही पहिली जयंती बारामतीकरांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी भावनिक ठरली. गोजुबावीतील अपघातस्थळी सुनेत्रा पवार काही क्षण निःशब्द बसल्याचे दृश्य अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले. त्यांच्या या भेटीने अजितदादांच्या आठवणी पुन्हा एकदा संपूर्ण राज्यासमोर जिवंत झाल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!