अजित पवारांना मोठा धक्का ; पक्षाच्या 43 जणांचे तडकाफडकी राजीनामे; काय आहे कारण?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या 43 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या कारणातून हे राजीनामे झाल्याची माहिती आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या या 43 पदाधिकाऱ्याचे कार्यकर्त्यांचे राजीनामे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षाने अलीकडेच राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबतच पक्षाच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षाने देखील राजीनामा दिला आहे. त्या दोघांचेही कट्टर समर्थक असलेल्या ४३ कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची साथ सोडली आहे. यामुळे पुसद शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना मोठा झटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष पठाण अहमद खान नजीर खान यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडे तर अल्पसंख्याक शहराध्यक्ष नन्हे खान चांद खान यांनी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाकडे राजीनामा दिला आहे. त्या दोघांच्या 43 कट्टर समर्थकांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसला आहे.
