धक्कादायक! आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता…

आंध्रप्रदेश : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात
हा अपघात कार्तिक महिन्यातील एकादशीच्या पवित्र प्रसंगी घडला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असताना मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दीचा दबाव वाढला, ज्यामुळे अनेकजण खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरुन अनेकांनी जाण्यास सुरुवात केली.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर कडक नजर ठेवली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान आज एकादशीनिमित्त मंदिरात गर्दी वाढली होती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. स्थानिक प्रशासनाने अपघाताची चौकशीचे आदेश दिले असून, गर्दी नियंत्रणात कुठे चूक झाली हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेनंतर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.
