‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका, हवामान विभागाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार? जाणून घ्या…


पुणे : बंगालच्या उपसागरात उद्भवलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर देशाच्या अनेक भागातील नागरिकांना पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री आंध्र प्रदेशात डकलेल्या या वादळाने मोठे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता याचा प्रभाव महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पुढील तीन दिवस दिसणार असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सोलापूर, सांगली वगळता आज २९ ऑक्टोबरला राज्यातील सर्व जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय आज पूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ३० ऑक्टोबरलाही राज्यभरात पावसाची शक्यता आहे. नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बुधवारी रात्री ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर इतका प्रचंड होता. या तीव्रतेमुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने आधीच इशारा दिल्याने किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते, मात्र तरीही मोठे नुकसान झाले.

दरम्यान, वादळाच्या तडाख्याने एकट्या आंध्र प्रदेशातच सुमारे ३८,००० हेक्टरवरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले असून, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत. प्रशासनाकडून मदतकार्य आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू असले तरी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘मोंथा’चा प्रभाव पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. यामुळे महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत (काही ठिकाणी ताशी ५५ किमी वेगापर्यंत). वादळाची तीव्रता हळूहळू कमी होत असली तरी, पुढील काही तास महत्त्वाचे आणि धोकादायक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!