रात्री-अपरात्री फक्त तिलाच… महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी सुरेश धस यांनी केला खळबळजनक खुलासा

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने तळहातावर पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्ंयाच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आता याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मृत डॉक्टरच्या बीड येथील मूळ गावी जाऊन कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे.
दरम्यान, या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली, मृत डॉक्टरवर फेब्रुवारी महिन्यापासून तिथले पोलीस अधिकारी सातत्याने चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकत होते. डॉक्टरने पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि डीवायएसपींकडे वारंवार तक्रार करूनही तिचे कोणी ऐकले नाही आणि ती एकटी पडली, असा दावा सुरेश धस यांनी केला.

याप्रकरणी केवळ अटक झालेल्या दोघांवर कारवाई करून पुरेसे नाही. बदने आणि बनकर यांच्याव्यतिरिक्त जे जे अधिकारी, कर्मचारी किंवा इतर कोणी यात दोषी असतील, त्यांनाही आरोपी म्हणून घेतले पाहिजे.
या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात यावी आणि या समितीत सर्व कर्मचारी महिला असावेत, अशी मागणी धस यांनी केली. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.
आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलीस बदने हे खुर्चीवर बसून डॉक्टरला धमक्या देत होते. तसेच, फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरूनही वाद झाला होता. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांनी तुमचे बीडचे लोक असे… असे म्हणून डॉक्टरला हिणवण्याची भूमिका घेतली होती.
रात्री अपरात्री फक्त तिलाच का बोलावले जात होते? बाकीचे मेडिकल ऑफिसर नव्हते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कुटुंबीयांना मुलगी फक्त पीएम रूममध्येच दाखवण्यात आली, असेही त्यांनी सांगितले आहे.