मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, कोणत्या महिन्यात होणार घोषणा?

पुणे : गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. आयोगाने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्यासाठी योजना आखली आहे. या संदर्भात आयोगाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनासोबत तयारीचा आढावा घेतला आहे. या निवडणुकांचा प्रस्तावित टप्पा समोर आला आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर अखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. तसेच जानेवारी १५ ते २० दरम्यान २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील, अशी माहिती समोर आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी अखेरपर्यंत सर्व निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यानुसार २० जानेवारीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
