४ वर्षापासून लोणी काळभोर येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक…

लोणी काळभोर : ४ वर्षापासून लोणी काळभोर येथील घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेश करुन जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी दिपक नामदेव घारोळे (वय २४, रा गल्ली नंबर ३, बिराजदार नगर, हडपसर पुणे) याला अटक करण्यात आली आहे. सन २०२१ मध्ये घारोळे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. गेल्या चार वर्षापासून वेशांतर करून तो पोलिसांना चकवा देत होता.

गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक मंगळवारी कोम्बिंग ऑपरेशन करत असताना, पथकास लोणी काळभोर येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक घारोळे हा बिराजदार नगर जवळ असलेल्या कालव्यालगत उभा आहे.

अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, काटे, लांडे ,धाडगे व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
