पुण्यातील सराफी दुकानावर डल्ला ; तब्बल 70 किलो चांदी पळवली, आरोपीस अटक

पुणे : पुण्याच्या गुरुवार पेठेतील एका जुन्या सराफी दुकानावर काही दिवसांपूर्वी चोरट्यानीं डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली होती.चोरट्यांनी तीन पोती भरून 70 किलो चांदी पळवली आहे.या चोरीचा आता खडक पोलिसांनी छडा लावला आहे.दागिने चोरणाऱ्या आरोपींपैकी एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदी जप्त केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,राजेश सरोज असं अटक केलेल्या ३६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्याच्या कुंडाख येथील रहिवासी आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. १४ आणि १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी गुरुवार पेठेतील सराफी पेढीवर डल्ला मारला होता. या चोरीत ६७ लाख ६० हजार रुपये किमतीची ७० किलोहून अधिक चांदीचे दागिने आणि ५ लाखांची रोकड असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला होता. चोरीला गेलेल्या ऐवजात ६२ लाखांच्या चांदीचा समावेश होता. चोरट्यांनी तीन पोती भरून चांदी चोरून नेली होती.चोरी केल्यानंतर आरोपींनी चांदीने भरलेली ही पोती वाहून नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे पोलीस आरोपींच्या मागावर होते. घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांत्रिक तपासणी केली. त्यातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उत्तर प्रदेश गाठले, असे तपासात समोर आले आहे.
