पुणे हादरलं! किरकोळ वादातून आधी बायकोची गळा दाबून हत्या, नंतर नवऱ्याने स्वतःलाही संपवलं..

पुणे: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दौंड तालुक्यात पतीने स्वतःच्या पत्नीचाचं गळा दाबून खून केला आणि काही वेळातच राहत्या घरात स्वतः आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्यामध्ये खून झालेल्या पत्नीचं नाव जयश्री अशोक गावडे (वय 45) असून तिच्या खुनानंतर पती अशोक मारुती गावडे (वय 50) याने देखील आत्महत्या केली. दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यापश्चात दोन मुले आहेत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की,या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर काही वेळातच अपराधगंडामुळे किंवा संतापातून अशोक यांनी राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली.
ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पती-पत्नीतील कौटुंबिक वाद हा प्राथमिक अंदाज आहे. दौंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
