प्राईमप्लस हॉस्पिटल, उरुळीकांचन येथे पोटातील तीन किलो वजनाच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया…


उरुळीकांचन : पोटात वाढलेल्या तीन किलो वजनाच्या गाठीमुळे मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या एका ४२ वर्षीय महिलेवर उरुळीकांचन येथील प्राईमप्लस हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलच्या डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

बारामती तालुक्यातील ही महिला अत्यवस्थ अवस्थेत प्राईमप्लस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने सवलती चा दरात शस्त्रक्रिया करण्यास तत्परता दाखवली. रुग्णाच्या पोटात असलेली गाठ गंभीर स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही गाठ पोटातील मोठ्या रक्तवाहिन्यांच्या जवळ असल्याने आणि रक्तवाहिन्यामध्येही गुठळ्या असल्याने तसेच कर्करोग असण्याची शक्यता लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची व जोखमीची होती.

संपूर्ण परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना गाठ काढण्याची विनंती केली व त्यासाठी संमती दिली. डॉक्टरांनी ही जबाबदारी स्वीकारून अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक शस्त्रक्रिया पार पाडली.

या शस्त्रक्रियेमध्ये तब्बल २४ x १५ सें.मी. आकाराची व तीन किलो वजनाची गाठ काढण्यात आली. या अत्यंत गुंतागुंतीच्या ऑपरेशनमध्ये प्रसिद्ध कर्करोग सर्जन डॉ. अमृता बेके यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ञ डॉ. अक्षय ढमढेरे, डॉ. नितीन शिरोळे, डॉ. राजेश आखाडे, डॉ. परिमल परदेशी तसेच प्राईमप्लस हॉस्पिटलच्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफने मोलाचे योगदान दिले.

या शस्त्रक्रियेमुळे ग्रामीण भागातही प्राईमप्लस हॉस्पिटल मधील आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून, वेळेत उपचार झाल्यास जीव वाचवणे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर समाधान व्यक्त करताना डॉ. अमृता बेके म्हणाल्या की, “प्राईमप्लस हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या टीमच्या समन्वयामुळे अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही ग्रामीण भागात शक्य होत आहेत, हे अत्यंत आनंदाचे व प्रेरणादायी आहे.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!