एक टन उसापासून २७ रुपये कपात! ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार, राजू शेट्टी यांनी मांडले गणित…

पुणे : पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० रुपये असा टनामागे १५ रु. कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्याचाच खिसा कापला. यावर शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे.

यावर ते म्हणाले, ऊस गाळपावर होणाऱ्या कपाती त्यांनी सांगितल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी ५.०० रूपये, वसंतदादा साखर संस्था १.०० रूपये, राज्य साखर संघ १.०० रूपये, साखर संकुल निधी ०.५० पैसे, गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी १०.०० रूपये, महामंडळ, पुरग्रस्त, शेतकरी निधी १०.०० रूपये, एक टन उसापासून जवळपास २७.५० रूपये कपात करून यावर्षी १२ कोटी टन उस गाळप गृहीत धरल्यास ३३० कोटी रूपये कपात होणार आहेत.
तसेच यावर रोहित पवार म्हणाले, ही एकप्रकारे आधुनिक टोलवसुलीच आहे. देवाचंच घेऊन देवाला लावणाऱ्या या सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का? मुख्यमंत्र्यांच्या बेडसाठी लाखो रुपयांचा तर निनावी जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो.

दोन्ही हातांनी मलिदा खाता यावा म्हणून पुण्याचा रिंग रोड १७ हजार कोटींवरून ४२ हजार कोटींवर नेता येतो, एमएसआयडीसीमार्फत २५ हजार कोटींच्या वर्क ऑर्डर देता येतात, महामार्गाचं टेंडर १५ टक्क्यांनी वाढवता येतं, निवडणुकीत उमेदवारांना खोकेच्या खोके देता येतात.
पण सामान्य जनतेला द्यायची वेळ आली की मात्र तिजोरीत खडखडाट असतो. अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार? असेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण तापले असून शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असताना त्यांच्याकडूनच पैसे घेतले जात आहेत.