राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजले; आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर…

पुणे : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवारी (ता.1) जाहीर करण्यात आला आहे. हे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात 32 जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. संबंधित ३२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील सदस्यांचे आरक्षण निश्चितीबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या आदेशातील सूचना तसेच आरक्षण निश्चित करण्याबाबतच्या कार्यक्रमानुसार सर्व संबंधित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी विहित कालावधीत आरक्षण अंतिम करण्याबाबतची कार्यवाही करावी.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करुन विभागीय आयुक्त यांच्याकडे 6 ऑक्टोबर पर्यंत सादर करावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनी 8 ऑक्टोबरपर्यंत मान्यता द्यावी.

आरक्षण सोडतीची सूचना 10 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रात प्रसिध्द करावी. आरक्षणाची सोडत जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तर पंचायत समितींसाठी तहसीलदारांनी 13 ऑक्टोबरपर्यंत काढावी. प्रारुप आरक्षणाची अधिसूचना 14 ऑक्टोबरला प्रसिध्द करावी.

दरम्यान, आरक्षणावरील हरकती व सूचना 14 ते 17 ऑक्टोबर पर्यंत करू शकतात. प्राप्त हरकतींवरील गोषवारा जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे 27ऑक्टोबर पर्यंत पोहोच करावयाचा आहे. त्यानंतर अंतिम आरक्षण विभागीय आयुक्त 31ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. व ते आरक्षण 3 नोव्हेबर पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करावे लागणार आहे. असे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी प्रशासनाला दिले आहे.