धाराशिवमध्ये 40 गाई मृत्युमुखी अन् मदत मिळाली 6 गाईंची, प्रशासन नेमकं करतंय काय? रोहित पवार आक्रमक…

धाराशिव : धाराशीवमध्ये दातखिळे या धनगर कुटुंबाने प्रामाणिकपणे अत्यंत मेहनत करून गाईंचा मोठा गोठा उभारला. पण अतिवृष्टीने आलेल्या पुरामध्ये त्यांच्या तब्बल ३५ ते ४० गाई मृत्यूमुखी पडल्या. यामुळे कुटूंबाचा मोठा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, मी स्वतः या कुटुंबाला भेट देऊन धीर दिला आणि प्रशासनाशी बोलून पंचनामा करण्यास सांगितलं. पण मदत देत असताना त्यांना केवळ ६ गाईची नुकसानभरपाई मिळतेय, हे योग्य नाही. याबाबत सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रशासनाने झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे केले. मात्र नुकसानभरपाई देताना नियमांचा अडसर येतोय. याबाबत अधिकाऱ्यांचेही हात बांधलेले आहेत. त्यामुळं पंचनाम्याप्रमाणे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि दातखिळे कुटुंबासह सर्वच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!

अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी हीच मागणी करत आहेत की नियम अटी लावू नका, यामुळे त्यांना मदत मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.