मोठी बातमी!अतिवृष्टीबाधितांसाठी श्री सिद्धीविनायक मंदीर न्यास तब्बल 10 कोटींची मदत करणार

पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी, सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक तडाखा यावेळी मराठवाड्याला बसला आहे. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, सामान्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता अतिवृष्टी बाधितांसाठी श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासानेही मोठा निर्णय घेतला आहे. मंदीर न्यासाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासाकडून अतिवृष्टीबाधीतांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे,असे न्यासाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता विरोधकांकडून होत आहे.श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
