पुण्यातील बँक कर्मचाऱ्यांचा कारनामा ; दिवसा बँकेत नोकरी अन रात्री मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हे दाखल..

पुणे : पुण्यातील बँक कर्मचाऱ्यांचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. बँकेत कार्यरत असणारा हा कर्मचारी दिवसा बँकेत करून रात्री ऑनलाईन मटका जुगारात सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.खडक पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार समोर आला असून, संबंधित कर्मचाऱ्यासह एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दिलीपसिंग परदेशी (वय 42, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, बेनकर वस्ती, धायरी गाव) अस अटक करण्यात आलेल्या बँक कर्मचाऱ्याच नाव आहे. त्याच्यासोबत ऑनलाईन मटका खेळणाऱ्या 17 जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल परदेशी हा B.Com पदवीधर असून सध्या बँकेत नोकरी करतो. दिवसा बँकेत कामकाज करून रात्री तो ऑनलाईन मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.या प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान ही माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तात्काळ पथक पाठवले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता राहुल मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना आढळून आला व त्याला ताब्यात घेण्यात आले.
