मोठी बातमी! शिंदे- पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची खेळी ; निवडणुकीत मोठा फटका बसणार?

पुणे : गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या गेल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने तातडीने राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.यानंतर आता राज्यातील सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठी खेळी केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट सांगितले,मुंबई महापालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढेल. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढेल. तर ठाणे महापालिका निवडणूक भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे लढवू शकते,’ असे ते म्हणाले. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अजित पवार गटाची चांगली ताकद आहे, अशा स्थितीत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप वेगळा पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सरकारने ३१ जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण करावी,’ असे आदेश दिले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत.राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयाने निर्धारित केलेल्या मुदतीत पार पाडणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात युती, आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस नवी दिल्ली येथे आले असता त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या मोठ्या खेळीचा फटका शिंदे- पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आहे.
