अजित पवारांची खेळी ; पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्षच लावला गळाला, प्रभावी नेता ‘कमळ ‘सोडून ‘घड्याळ’ बांधणार..

पुणे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष अजित पवारांची कोंडी करत असताना आता अजित पवार यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी असणारे जालिंदर कामठे हे 3 वर्षांनांतर पुन्हा एकदा स्वगृही परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. जालिंदर कामठे हे शुक्रवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.

जालिंदर कामठे हे 80 च्या दशकापासून शरद पवार आणि रामकृष्ण मोरे यांच्या सानिध्यात काम करत होते. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेतील 55 पैकी 53 जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीसोबत आणण्यात जालिंदर कामठे यांचा मोठा वाटा होता. ते त्यावेळेस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा होते. जालिंदर कामठे यांच्या पत्नी सुद्धा पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती राहिलेल्या आहेत. कामठे यांच्या प्रवेशाने पुरंदर तालुक्यासह पुणे शहरातील कोंढवा परिसरात सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मध्ये तीन नंबरला फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादीची ताकद जालिंदर कामठे यांच्या प्रवेशाने वाढणार आहे. तर अजित पवारांच्या मिशन जिल्हा परिषदेसाठी सुद्धा कामठे यांच्या प्रवेशाने मोठं बळ मिळणार आहे.भाजपमध्ये प्रवेशाचा लोंढा सुरु असताना अजित पवारांनी थेट भारतीय जनता पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्षच आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे.
