‘मशाल धगधगणार, मुंबई जिंकणार’ ; दसरा मेळाव्याच्या तोंडावर ठाकरेंची जोरदार बॅनरबाजी, वातावरण तापलं!

मुंबई : दसरा मेळाव्याच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या 2 ऑक्टोबरला दसरा असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागल असताना शिवसेना भवनाबाहेर. ’मशाल धगधगणार, मुंबई जिंकणार’ अशा आशयाचे बॅनर लावून ठाकरे गटाकडून शिवसैनिकांचे स्वागत करण्यात येत आहे. या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने अनेक पक्ष आपापली भूमिका मांडत असतात, स्पष्ट करत असतात, पण मुंबईत दसऱ्याचे आकर्षण म्हणजे शिवसेनेचा मेळावा. एकनाथ शिंदे यांनी बंड करत फडणवीसांचा हात धरल्यापासून शिवसेनेचे दोन भाग झाले आणि उद्धव ठाकरे गट वि एकनाथ शिंदे गट, असे दोन गटही पडले.
या दोन गटांच्या मेळाव्यांमुळे राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाही 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या दोन्ही मेळाव्यात काय भाषणे होतात, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे तर आझाद मैदानावर शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दसरा मेळाव्याच्या पूर्वीच बॅनरबाजीला ऊत आला असून बॅनरबाजीच्या माध्यमातून उद्धव गटाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा संदर्भ देत ‘मुंबई जिंकणार’चा नारा दिला आहे. लवकरच महापालिका निवडणुकांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा तारखांची घोषणा होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर हा मेळावाही महत्वाचा ठरत आहे.
