नायगाव, पेठमध्ये दीड लाखांची वीजचोरी, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुळशी विभागाच्या भरारी पथकाने नायगाव, पेठ परिसरात छापा टाकून सुमारे दीड लाखांची वीज चोरी उघडकीस आणली आहे.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात लाल व काळ्या रंगाची वायर अनधिकृतरीत्या जोडून, वीजमीटरशिवाय वीजचोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही वीजचोरीची घटना २४/०२/२०२४ ते ०५/०५/२०२५ रोजी सकाळी२ वाजून३५ मिनिटांच्या दरम्यान पेठ नायगाव (ता. हवेली) परिसरात घडली आहे.
काळूराम शिवराम बाबर व विशाल काळूराम बाबर (रा. पेठ, नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे वीजचोरी करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दिप्ती अनिल पाटील, (वय-४४, व्यवसाय-नोकरी, नेमणूक-भरारी पथक, मुळशी विभाग, पॉवर हाऊस, रास्तापेठ, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळूराम बाबर व विशाल बाबर यांनी अनधिकृतपणे, अप्रामाणिकपणे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी वीज मीटरच्या आधी इनकमिंग सर्विस वायर टॅप केल्याचे आढळून आले.
तसेच दोघांनी मागील १६ महिन्यात ५५३९. ६४ युनिटसची वीजचोरी केली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महावितरण कंपनीचे १ लाख ५१ हजार ३० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे आढळून आले. त्यांच्या मीटरची तपासणी वेळी 4.05 kw जोडभार आढळुन आला. तसेच ग्राहकाने वीज चोरी देयक 1 लाख ५१ हजार ३० रुपये व तडजोड देयक १० हजार रुपये आज तागायत भरले नाहीत.
दरम्यान, मागील १६ महिन्यात ५५३९.६४ युनिटसची वीजचोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी काळूराम बाबर व विशाल बाबर यांच्या विरूध्द भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सस्ते करीत आहेत.