अजित पवारांना मोठा धक्का ; नागपूर जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, काय आहे कारण?

पुणे : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनामामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजीनाम्याबाबत बोलताना गुजर यांनी म्हटलं आहे की,मी हा राजीनामा तडकाफडकी न देता मागील 15 दिवसांपासून वरिष्ठांना सांगितल्याचे स्पष्ट केले आहे. मी स्वतःच्या इच्छेने पद सोडत आहे. माझ्यावर कोणतीही नाराजी नाही, पक्षाविषयी कुठलीही खंत नाही. मी अजूनही पक्षाच्या कामासाठी सक्रिय राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.तसेच आता इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. पक्ष वाढीसाठी जो कोणी कार्यकर्ता प्रामाणिकपणे मेहनत करेल त्याचे मी नेहमीच अभिनंदन करीन. माझ्यासोबत ज्यांनी काम केले, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मी आभार मानतो.हा निर्णय पक्षाच्या भविष्यासाठी योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जो कोणी नियुक्त होईल त्याला मी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने मदत करेन. शेवटी पक्ष हाच महत्त्वाचा आहे,असेही गुजर यांनी म्हटले आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजर यांनी राजीनामा दिल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
