आधार कार्डबाबतची ‘ही’ चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयचे कडक नियम लागू..

नवी दिल्ली : आजच्या काळात आधार कार्डशिवाय जीवन जगणे कठीण झाले आहे. बँक व्यवहार असो, मोबाईल सिम घेणे असो, सरकारी योजना घेणे असो किंवा शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते. प्रवासासाठीदेखील ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. पण आधारसंबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास आता मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने याबाबत कडक नियम लागू केले असून, चुकीची माहिती देणे किंवा गैरवापर करणे गंभीर गुन्हा मानला जाईल.
जर कोणी आधार कार्डसाठी अर्ज करताना खोटी किंवा चुकीची माहिती सादर केली, तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करताना नेहमी सत्य माहिती आणि योग्य कागदपत्रेच द्यावीत, असा UIDAI चा सल्ला आहे.

दरम्यान, दुसऱ्या व्यक्तीच्या आधारमध्ये बदल करणे, छेडछाड करणे किंवा अनधिकृत माहिती घेणे हा गुन्हा मानला जातो. यासाठीही 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो. आधार हा वैयक्तिक ओळखीचा दस्तऐवज असल्याने परवानगीशिवाय त्यात बदल करणे धोकादायक ठरू शकते.

यूआयडीएआयच्या परवानगीशिवाय आधारसंबंधित माहिती उघड करणे, गोळा करणे किंवा लीक करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात 3 वर्षांचा तुरुंगवास आणि ₹10,000 दंड होतो. एखाद्या कंपनीने असे केल्यास तिला तब्बल ₹1 लाख दंड भरावा लागू शकतो. नागरिकांच्या गोपनीयतेशी संबंधित कोणतीही माहिती गैरवापरासाठी दिल्यास कायदेशीर कारवाई अपरिहार्य आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, जर कोणी आधार केंद्रावर हॅकिंग केलं किंवा डेटा चोरीचा प्रयत्न केला, तर त्याला थेट 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ₹10,000 ते ₹10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. यूआयडीएआयने या संदर्भात स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रकारांना शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल.