लोणी काळभोरमध्ये भीषण अपघात! महामार्गावर कंटेनर पुलावरून खाली कोसळला…

लोणी काळभोर : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी कॉर्नर येथे कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. कंटेनर थेट १२ ते १५ फूट खाली कोसळला आहे. हा अपघात मंगळवारी (ता. २३ ) सकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

तसेच या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. तर कंटेनर चालक सदर ठिकाणावरून पळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा कंटेनर हा सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. लोणी कॉर्नर येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आला असता चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले व कंटेनर दुभाजक तोडून थेट हॉटेल जगदंब च्या पाठीमागे असलेल्या १२ ते १५ फूट पुलाच्या खाली कोसळला.

यावेळी महामार्गावर वाहनचालकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सदर अपघाताची माहिती मिळताच भरपावसात वाहतूक शाखेचे कर्मचारी उमेश ढाकणे, आनंद साळुंखे व सचिन कांबळे यांनी तात्काळ अपघात ठिकाणी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, मार्शलचे खोत व ताम्हाणे यांनी अपघात ग्रस्त कंटेनारची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.