मनपा निवडणुकीआधी ठिणगी ; शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, 3 जण जखमी…

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कल्याण शहाड सेशन परिसरात नवरात्रीच्या बॅनर वरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.या हाणामारीत तीन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणारा बॅनर भाजपच्या फ्रेमवर लावल्यामुळे हा वाद पेटला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका जोरदार पेटला की हाणामारीमध्ये भाजपचे मोहन कोणकर, शिंदे गटाचा मुकेश कोट आणि आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले. तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या आधीच ही घटना घडल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते युतीला कसे साद देतील, याची चर्चा सुरू झाली आहे.
