मोठी बातमी! ‘लाडकी बहीण’ नंतर आता अन्नपूर्णा योजना, तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत, योजनेच्या अटी काय?

पुणे : गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी मोठमोठ्या योजना सुरू केल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य आहे.

राज्य सरकारने घरगुती इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरूवात केली आहे.या योजनेचा गॅस कनेक्शन असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी १४.२ किलो वजनाचे तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.यासाठी केंद्र सरकारकडून ३०० रुपये आणि राज्य सरकारकडून ५३० रुपये मिळून एकूण ८३० रुपयांचे अनुदान मिळते, ज्यामुळे सिलिंडर पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ दर महिन्याला एकदाच घेता येणार आहे.
योजनेच्या अटी

गॅस जोडणी महिलेच्या नावावर असावी. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळेल. एका रेशन कार्डावर फक्त एका महिलेलाच हा लाभ मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून करता येईल. ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
तर ऑफलाइन अर्जासाठी अर्जदार महिलांनी अन्नपूर्णा योजना फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयात जमा करावा लागेल.
या योजनेचा फायदा -दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर.महिलांचे व मुलांचे आरोग्य सुधारेल.वेळ आणि खर्चाची बचत.घरात स्वच्छतेचे वातावरण टिकेल.ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार असून महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करता येणार आहे. तसेच धुरापासून होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळून पर्यावरणाच्या रक्षणालाही मदत होणार आहे.